महत्वाची सुचना: ही कविता माझ्या अनुभवांवर लिहिलेली नाही
बायको जेंव्हा बोलत असते
तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
भडका असतो उडालेला
अनावर असतो रोष
वाभाडे काढत आपले ती
सांगत असते दोष
आपले दोष, आपल्या चुका
सारं सारं...
स्वीकारायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
शब्दानं शब्द वाढत जातो
भडकत जातो तंटा
म्हणून वेळीच ओळखायची असते
आपण धोक्याची घंटा
समोरची तोफ बरसली तरी
आपण...
तोंड उघडायचं नसतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
गरजून बरसून झाल्यानंतर
थकून जाते बायको
आग पाखडून झाल्यानंतर
शांतही होते बायको
अशाच वेळी विसरून सारं
तिला...
जवळ घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
तिची चिडचिड, तिचा संताप
प्रेमच असतं हेही
तिची बडबड, तिची कडकड
प्रेमच असतं तेही
तिचं प्रेम तिनं करावं
आपलं....
आपण करायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असत?
No comments:
Post a Comment